मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना फुटी नंतर गेल्या ९ महिन्यापासूनचा ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद काही मिटत नाही, त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या होत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी विषयी पुन्हा एकदा वक्तव्य केल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे. या संदर्भात शिंदेंनीही प्रतिक्रीया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोरी करण्याआधी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर आले होते. आणि म्हणाले की, भाजपसोबत गेलो नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा मला अटक करतील. असे सांगून ते रडले होते. तसेच, ते म्हणाले की, भाजपबरोबर चला, नाहीतर मला अटक होईल. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यास ठामपणे नकार दिला. हे चाळीस लोक त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी भाजपसोबत गेले असून दुसरे काही कारण नाही, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, “त्यांच्याकडे कुठे लक्ष देता? ते जाऊ द्या रे. अजून लहान आहेत.” अशी दोन शब्दात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के म्हणाले की, दिल्लीप्रमाणे राज्यामध्येही एक पप्पू तयार झाला आहे. एकनाथ शिंदे हे शेतकरी, कष्टकरी नागरिकांचे अश्रू पुसणारे असून मासा मेला म्हणून घरात बसून रडणारे नाहीत. ते रडणारे नाहीत, रडवणारे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटले आहे. माझ्या घरात येऊन एकनाथ शिंदे हेच बोलले होते की, भाजपासोबत जायला पाहिजे नाहीतर मला जेलवारी करावी लागेल. आपण गटबंधन हे तोडलं पाहिजे. यावेळी मी त्यांना एकाच सवाल केला की, आपल्याला हे असे का करायचे आहे. जर पक्षाने आपल्याला संधी दिली आहे तर ती आपण निभावून दाखवू, असे राऊत म्हणाले. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसेच त्यांच्याबरोबर गेलेले त्यांचे चाळीस साथीदार आमदार घाबरूनच गुवाहाटीमध्ये पळाले होते, असेही राऊत म्हणाले.
Politics Shivsena Aditya Thackeray Claim Eknath Shinde