शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाची संपूर्ण धुरा युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर आहे. अमित ठाकरे राज्यभर दौरा करताहेत. मात्र, शिर्डी येथे त्यांनी चार तासांपासून प्रतीक्षा करणाऱ्या मनसैनिकांना भेटण्यास पुरेसा वेळ न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारानंतर तेथील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या कार्यकारिणीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
अमित ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारणात सक्रीय झाले आहेत. एकीकडे राज ठाकरे यांच्या सभा, बैठका काहीशा थांबलेल्या असताना अमित ठाकरे यांनी जनतेत जाण्यास पसंती दिली आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर ते भर देत आहेत. अशात शिर्डी येथे त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यास मुबलक वेळ न दिल्याचे उलट परिणाम पक्षाला भोगावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिशिंगणापूर इथे शनीला तैलाभिषेक केला. अमित ठाकरे मनसेला उभारी देण्यासाठी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे.
शनिशिंगणापूर दर्शन घेतल्यावर रात्री उशीरा अमित ठाकरे शिर्डीत दाखल झाले. चार तास वाट बघून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कारण, अमित ठाकरे राहाता शहरात केवळ 20 सेकंद थांबल्याने कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. यामुळे मनसे महासंपर्क अभियान पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकी अगोदर मोठी नाराजी पसरली आहे. मनसेच्या नामफलकाचे अनावरण न करताच अमित ठाकरे शिर्डीकडे रवाना झाले. उद्विग्न झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने नामफलकाचा कव्हर फाडला. राजीनामे देणार असल्याची भावना पदाधिकाऱ्याने व्यक्त केल्या आहेत.
गाडी अडविली म्हणून टोलनाका फोडला
अमित ठाकरे यांची गाडी अडविली म्हणून मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. ही घटना समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर घडली. गेल्या पाच दिवसांपासून अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार नंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने येत होते. दरम्यान गोंदे फाटा टोलनाक्यावर त्यांची गाडी अडविल्याचा प्रकार घडला. त्याचा बदला म्हणून रात्री अडीच वाजता सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फोडला.