मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राज्यात दोनच नेते जास्त चर्चेत आणि फर्मात आहेत, असे म्हटले जाते. ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय. त्यामुळे हे दोघे काय बोलतात याच्याकडे केवळ मीडियाचे नव्हे तर संपूर्ण जनतेचे लक्ष असते. त्यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने तसेच त्यांच्या शिंदे फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्याने तिन्ही पक्षांची युती होणार का? याबाबत चर्चा सुरू होती. त्याचवेळी आता शिंदे यांना तुम्ही भाजपमध्ये जाणार होते? त्याचे काय झाले. अशी विचारणा झाल्याने त्यांनी या प्रश्नाला त्यांच्या भाषेत उत्तर दिले. आता त्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणुकांसाठी मनसे. शिंदे गट आणि भाजपाची युती होणार असा अंदाज बांधला जात आहे. याबाबत शिंदे, गट, मनसे आणि भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केले होते. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. बंडखोर शिंदे गट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्यांवरही एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही भाजपामध्ये जाणार असं म्हटलं जात होत? असा शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, ते केवळ म्हणत होते ना! तसेच ते तर असंही म्हणत होते की भाजपाचा मुख्यमंत्री होणार! पण कुठे झाला भाजपाचा मुख्यमंत्री? आमच्याबद्दल ते ( म्हणजे उध्दव ठाकरे वैगेरे.. ) काय काय म्हणत होते त्यावेळेस, हे होणार, ते होणार ! पण आम्ही लोक बाळासाहेबांची विचारसणी पुढे नेत आहोत. आम्ही बिलकूल मागे हटलो नाही, असे त्यांच्या नेहमीच्या भाषा शैलीत शिंदे यांनी उत्तर दिले. मुलाखतकाराने बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन जाणार हे निवडणुकांनंतर स्पष्ट होईल असे म्हटले असताना शिंदेंनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा संदर्भ दिला.
तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या दिपोत्सव या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील तीन मोठे नेते एकत्र दिसले होते. तेव्हापासून महायुतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची महायुती होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबरोबरच पक्षचिन्हावर आपला दावा कायम असल्याचे विधान मुंबईमधील एका कार्यक्रमातील मुलाखतीत केले आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्ष मोठा करण्यात सर्वांचाच वाटा असून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे ठामपणे म्हटले आहे.
खरे म्हणजे आम्ही दुसरीकडे गेलेलोच नाही. आम्हीच पक्ष आहोत, असे सांगत शिंदे म्हणाले की, आपल्या देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असेल की पक्षाच्या अध्यक्षांना पक्षातून काढून टाकले, कारण पक्ष तर आम्हीच वाढवालाय ना? आम्हीच बाळासाहेबां- बरोबर काम करुन पक्ष वाढवला आहे. सर्वांचीच मेहनत हा पक्ष मोठा करण्यामध्ये आहे, असे रोखठोक उत्तर दिले. त्याबद्दल आता उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Politics Shinde Group Will Join BJP CM Shinde Says