मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारल्यापासून नांदगावचे आमदार सुहास कांदे हे राज्य पातळीवरच चर्चेत आहेत. त्यांची विविध वक्तव्ये आणि आरोप यामुळे त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा मनमाडला झाल्या. त्यामुळे येथील निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक ही आमदार कांदेंसाठी पहिली परीक्षा होती. त्यातील नांदगाव समिती कांदेंनी राखली पण मनमाडमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ पैकी १२ जागावर विजय संपादन करुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलला धक्का दिला. या ठिकाणी केवळ ३ जागा आ. कांदे यांच्या पॅनलला मिळाल्या. रविवारी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. कांदे यांनी १८ पैकी १५ जागांवर विजय संपादन करत महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव करत सत्ता राखली. पण, मनमाडमध्ये आ. कांदे यांना धक्का बसला. या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती या नांदगाव विधानसभा मतदार संघात आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे पाच माजी आमदारांनी एकत्र येऊन दोन्ही ठिकाणी आ.कांदे यांच्या विरुध्द पॅनल उभे केले होते.
नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेत फुट पटल्यानंतर ठाकरे गटात असलेले जिल्ह्यातील दोन्ही आमदार शिंदे गटात गेले होते. त्यात पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांना हिरे यांनी कृऊबा निवडणुकीत धक्का दिला. त्यामुळे आ. कांदे यांच्या नांदगाव कृऊबा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात आ. कांदे यांना नांदगावमध्ये सत्ता राखण्यात यश आले तर मनमाडमध्ये मात्र त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या पॅनल विरोधात माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड. अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, संजय पवार, राजेंद्र देशमुख यांनी पॅनल उभे केले होते.
या निवडणुकीत व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनल विजयी झाले असून या दोन्ही जागेवर दादा बंब व रुपेश ललवाणी विजयी झाले आहे. तर हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार मधुकर उगले विजयी झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी आ.संजय पवार व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी सुध्दा विजय मिळवला आहे.
Politics Shinde Group MLA Suhas Kande APMC Result