मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंडखोरी करून सत्तेत गेलेल्या शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नियमीत लक्ष आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफुस थांबत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा शिवसेनेनं वर काढला आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा याच्या केंद्रस्थानी अब्दूल सत्तार आणि गुलाबराव पाटील आहेत.
सत्तार आणि पाटील यांच्यातील वाद राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात. अश्यात सत्तार यांनी आपल्याच पक्षातून फटाके लावले जात असल्याचा आरोप केल्यामुळे हा वाद पुन्हा रंगू लागला आहे. सत्तारांनी जाहीरपणे हे विधान केल्यामुळे नेमकी कोणती व्यक्ती त्यांच्याविरुद्ध कट रचत आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला लागली आहे. अर्थातच गुलाबराव पाटील यांचं नाव मध्ये घालण्यात आल्याने त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही लोक मिळून आम्हा दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचवेळी भांडणं लावण्याच्या मुद्यावरून गुलाबराव पाटील यांचा महाविकास आघाडीच्या काळातील एक व्हिडियो व्हायरल करण्यात आला आहे. आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात राजकीय प्रतिष्ठेवरून कलह माजला आहे, असा दावाही केला आहे. या एकूणच घटनाक्रमातून शिंदे गटाला अस्वस्थ ठेवण्याचं काम विरोधक करीत आहेत, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
नेत्यांनी भान राखावे
पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मात्र अब्दूल सत्तार यांनाच भान राखण्याचा सल्ला दिला आहे. आपण जाहीरपणे एखादं विधान करताना पक्षाच्या प्रतिष्ठेचा विचार करावा, असेच त्यांना सूचवायचे असणार. शिवाय आपल्याला जनतेची सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे, तीच योग्य पार पाडावी, असेही त्यांनी सत्तारांना म्हटले आहे.
भाजप मस्त, बाकी सुस्त
शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ते आलेला भाजप आनंदात आहे आणि आता आपले पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा शिवसेनेनं अनेकदा केला आहे. विशेषतः भाजपच्या मिशन १४४ मुळे तर ते स्पष्टच झालं. या मिशनमधून शिंदे गटाचं अस्तित्व आपण मानत नाही, हे स्पष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही शिवसेना म्हणत असते. त्यामुळे मिशन १४४ आणि सत्तारांचं विधान या दोन्ही गोष्टींवरून शिंदे गटातील धुसफूस जाहीरपणे पुढे आली आहे.
Politics Shinde Group Ministers Conflict Shivsena
Abdul Sattar Gulabrao Patil Dispute