मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्तांतरण घडून आल्यापासून राजकीय घमासान सुरू आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरून वाद पेटला आहे. त्यातच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी वोटरतर्फे निवडणूक सर्वे करण्यात आला. त्यातून पुढे आलेला निष्कर्ष सत्तेत असणाऱ्या भाजप-शिंदे गटाची चिंता वाढविणारा ठरला आहे. सर्वेतून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल ३४ जागा तर भाजप- शिंदे –आरपीआय महायुतीला केवळ १४ जागा मिळू शकतील असा अंदाज पुढे आला आहे.
२०१९ मध्ये महायुतीचे ४१ खासदार निवडून आले होते. त्यापैकी शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. पण, आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला फक्त १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भाजपला २७ जागांवर फटका बसू शकतो. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेला. महाविकास आघाडीचे सहा खासदार जिंकले होते. पण, यावेळी महाविकास आघाडीला २८ जागांचा फायदा होईल, असा अंदाज आहे.
ठाकरेंना ४० जागा जिंकण्याचा विश्वास
निवडणूक सर्वेत महाविकास आघाडीला ३४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्वेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी घट्ट राहिली, तर कमीतकमी ४० जागा जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राजकारणात बेरजेचे गणित वेगळे – शिंदे
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. चार-सहा जागा राखल्या तरी त्यांचे मोठं काम होईल. आघाडी होईल, असे गृहित धरून दिशा बांधणे ही दिशाभूल आहे. राजकारणात निवडणुकांच्या गणितात दोन आणि दोन चार कधीच होत नाही. मायनस किती होतील, हे येणारा काळ ठरवेल, या शब्दात शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Politics Shinde Group Current Situation Shivsena