मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील झाल्यापासून अजितदादाच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. विशेष म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून शिंदेंना केंद्रात पाठविले जाईल, असेही बोलले जात होते. मात्र आता तर अजितदादांनीच असे काही केले आहे की, त्यामुळे ही चर्चा अधिकच रंगायला लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि असे काही आदेश दिले की राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधले गेले आहे. पक्षातील नेत्यांना अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) मतदारसंघांचाही समावेश आहे. विशेषतः शिंदे गटाच्या १३ मतदारसंघांचा समावेश असल्यामुळे अजित पवार यांनी शिंदेंनाच अल्टीमेटम दिल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपनेही आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दौरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भाजपने कामही सुरू केले आहे. अशात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून शिंदे गटाची गळचेपी करीत आहे, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमच्या शेजारी अजित पवार यांचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. त्यावरून शिंदे यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम भाजप करीत आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
शिंदेंच्या विभागांचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागांचा आढावा घ्यायची सुरुवात अजित पवार यांनी केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय शिंदेंना कुठलाही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदेंच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असल्याचा टोमणाही लगावला आहे.
Politics Shinde Group Constituency Ajit Pawar NCP