नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अशासकीय सदस्य म्हणून आपल्या चार उमेदवारांच्या नावांची शिफारस करून भाजपने शिंदे गटाला धक्का दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याची बाब बघता, भाजपाची ही खेळी शिंदे गटावर कुरघोडी मानली जात आहे.
शिवसेनेतून चाळीस आमदारांना फोडत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला. या बदल्यात शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले. हा शिंदे गटासाठी सुखद धक्काच मनाला गेला. शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेली भाजपा आता मात्र त्यांना नियंत्रित ठेऊ पाहत आहे. किंबहुना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलाच वरचष्मा कसा राहील, याची काळजीच भाजपा नेते घेत आहे की काय, अशी शंका राजकीय वर्तुळातून घेतली जात आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अशासकीय सदस्य निवडीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या या खेळीचा अंदाज आला आहे. ज्यांना सदस्य करावयाचे आहे, अशा चार जणांच्या नावांची शिफारस स्थानिक भाजपा नेत्यांनी केली हे करताना शिंदे गटाच्या एकही उमेदवाराच्या नावाचा विचार केला गेला नसल्याची बाब लपून राहिली नाही. भाजपच्या या खेळीने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असतानाही स्थानिक पातळीवर मात्र भाजपेयींकडून पद्धतशीरपणे कार्यक्रम केला जात असल्याची खंत शिंदे गटात आहे.
बाजार समितीच्या बाबतीत भाजपाची ही भूमिका असेल तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद -पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये कितपत विचारात घेतले जाणार, असेही शिंदे गटाचे पदाधिकारी खाजगीत बोलून दाखवत आहे.तर भाजपा मात्र शिंदे गटाचा सोयीनुसार वापर करून आपलेच वर्चस्व कायम कसे राहील, याची पुरेपूर काळजी घेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Politics Shinde Group BJP Election Nashik
ओझशण