मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त सत्ताधाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तर, विरोधकांनीही आता कंबर कसली आहे. गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के; राष्ट्रवादी काँग्रेस खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध करणार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पाटील म्हणाले की, महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या २० जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा, शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे.
शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, असेही प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून द्यायचा आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गद्दारांविरोधात खालील विविध घोषणा देऊन अख्खा महाराष्ट्र दुमदुमून टाकावा, अशी हाक प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली आहे.
घोषणा खालीलप्रमाणे
आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी…
चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव..!
महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त…
पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…
गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!
महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार…
खोके सरकारचा चालणार नाही थाट
गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट…
पन्नास खोके, गद्दार ‘Not’ ओके…
खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय…