मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारावर आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातच बैठका झाल्या. मात्र आता या बैठकांमध्ये अजित पवार यांच्या निमित्ताने आणखी एक जण जोडला गेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यामुळे एक भागिदारही वाढलेला आहे. याच भागिदारीवर सोमवारी रात्री वर्षा निवासस्थानी तीन तास बैठक रंगल्याची चर्चा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थी मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप या दोन विषयांवर तीन तास खलबतं रंगल्याची चर्चा आहे. या बैठकीला अर्थाच फडणवीस यांच्या एन्ट्रीनंतर सुरुवात झाली. पण त्यावेळी फक्त फडणवीस आणि शिंदेच बैठकीत होते. त्यानंतर एक तासाने अजित पवार बैठकीत सामील झाले. पुढे तिघांमध्येही जोरदार चर्चा झाली. शिंदे-फडणवीस सरकार चांगले सुरू असताना मध्येच राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याचे काय कारण आहे, असा संतप्त सवाल शिंदे गटाच्या आमदारांनी उपस्थित केला आहे.
कारण मंत्रिमंडळ विस्ताराकडे त्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. यात चांगली खाती मिळण्याची अपेक्षाही त्यांना होती. मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, आदिती तटकरे यांच्यासारखे दिग्गज नेते सत्तेत दाखल झाले. त्यामुळे चांगल्या खात्यांमध्ये मोठी विभागणी शक्य आहे, याचा अंदाज शिंदे गटाच्या आमदारांना आधीच आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठीच तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाल्याचे समजते.
एक तास उशिरा, एक तास आधी
सोमवारी झालेल्या तीन तासाच्या बैठकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य अजित पवार यांची एन्ट्री आणि एक्झीट होय. या बैठकीला अजित पवार एक तास उशिरा आले आणि एक तास आधीच बाहेर पडले. त्यामुळे शिंदे-फडणवीस बैठकीत अजितदादांचा सहभाग केवळ भूमिका तपासून घेण्यापूरताच होता, असे स्पष्ट होते.