मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रीवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. दोन वेगवेगळे गट दिसून येताहेत. मात्र, राष्ट्रवादी एकसंघ रहावी आणि त्यांनी भाजपशी जुळते घ्यावे, यासाठी अजितदादा प्रयत्नरत असल्याची माहिती आहे. नव्या फॉर्म्युलानुसार, सुप्रिया सुळे यांना केंद्रात स्थान देणे आणि जयंत पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.
राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा नाही. कोण कुणाकडे जाईल, कुण कुठे बंड करेल… काहीच सांगता येत नाही. अशात आता राष्ट्रवादीचे दोन गट न राहता ती एकसंघ राहावी, यासाठी अजितदारांनी नवीन फॉर्म्युला आणला आहे. प्राप्त माहितीनुसार, जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत. तर अजित पवार गटाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राजीनामा देणार आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांना केंद्रात स्थान मिळणार आहे. मात्र, यासाठी सीनिअर पवार अर्थात शरद पवार यांची संमती मिळणे आवश्यक होऊन बसले आहे. त्यासाठी भाजपने भाजपने अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ताबडतोब बढती द्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी एकत्र राहण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात दोन चांगली खाती लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका उच्चपदस्थ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. भाजपसोबत जुळवून घेण्यासाठी राष्ट्रवादी पूर्वीपासून तयार होती. शरद पवार यांनी भाजपसोबत सत्ता वाटपासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा समावेश असलेली चार सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यातून हा नवीन फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या बैठकीला जाणे टाळले
अजित पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या वाटाघटीदरम्यान शरद पवार यांनी १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीला जाण्याचा बेतदेखील रद्द करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, १७ जुलैला अजित पवार आणि इतर आमदारांची भेट घेऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी बैठकीला हजेरी लावली. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेदेखील जाणार होत्या. परंतु, ऐन वेळेवर त्यांनी जाणे रद्द केल्याची माहिती आहे.
बारामतीत अजित पवारांचा पगडा
सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बारामतीवर अजित पवारांचा पगडा आहे. त्यांचे तिथे वर्चस्व आहे. याची पूर्ण जाणीव सुप्रिया सुळे यांनादेखील आहे. तिथे जागा राखण्यासाठी सुप्रिया सुळेंना अजित पवारांचा पाठींबा लागणार आहे. परिणामत: सुप्रिया सुळेंनीदेखील आक्रमक भूमिका घेणे टाळले आहे. मात्र, कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचा नातू असलेल्या रोहित पवार यांनी भाजपसोबत राष्ट्रवादीने जाण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.