मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे अध्यक्ष रामदास आठवले नाराज झाले आहेत. तसे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांच्या शिवसेनेने हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ही बाब आठवले यांना खटकली आहे. मुळात दोन्ही नेते दलितांचे नेतृत्व करतात, पण तात्विक मतभेदांमुळे राजकीय व्यासपीठावर त्यांचे कधीच पटले नाही. परिणामी, आता आठवले काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जो पक्ष सत्तेत असतो, त्याच्यासोबत राहण्यात अर्थ असतो, असे विधान काही वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी केले होते. जिधर दम उधर हम अशी भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्धस आहेत. ते स्वतः देखील यासंदर्भात कधीच आपली भूमिका लपवत नाहीत. भाजप सत्तेत येण्यापूर्वी ते युपीएसोबत सत्तेत होते. आता २०१४ पासून ते भाजपसोबत सत्तेत आहेत. पण, तसे केल्याशिवाय लोकांना न्याय कसा मिळवून देणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे असते. अश्यात विरोधी बाकांवर बसलेले प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी अचानक शिंदे-फडणवीस सरकारशी मैत्री करणे, अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहे. त्यातही रामदास आठवले यांनी आपल्याला न विचारता कवाडेंना युतीत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
विश्वासात घ्यायला हवे होते
जोगेंद्र कवाडे यांना युतीत घेण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, या शब्दांत रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही प्रकारची माहिती न देता थेट घोषणा करण्यावरूनॉही त्यांनी शिंदे व फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
कवाडे तर चांगले मित्र
प्रा. जोगेंद्र कवाडे माझे चांगले मित्र आहेत. अनेक वर्ष आम्ही सोबत होतो. पण महायुतीत त्यांना घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला विचारात न घेता थेट घोषणा करणे आवडले नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेत घेतले असते तर ठिक
शिवसेनेत एखाद्या नव्या पक्षाला सामावून घ्यायचे असेल तर आम्हाला काहीच घेणेदेणे नाही, पण एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये एखाद्या नवीन पक्षाला सामावून घेताना किमान सर्वांचा विचार घेणे आवश्यक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी विचारात घेतले होते की नाही, माहिती नाही, अशी टिका आठवले यांनी केली. त्याचवेळी या संदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
Politics RPI Ramdas Athavale Upset in Yuti What Next
Jogendra Kawade