नवी दिल्ली – पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील एका राज्यसभेच्या जागेवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आपला डाव खेळला आहे. पक्षाने जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केले आहे. या निर्णयामुळे असंतुष्ट गटातील वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या पुनरागमनाचा रस्ता बंद झाला आहे.
दावेदारांकडे कानाडोळा
राज्यसभेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची महाराष्ट्रातील एक जागा निश्चित आहे. रजनी पाटील यांनी आझाद यांच्यासह कमीत कमी आठ दावेदारांना धोबीपछाड दिला आहे. आझाद यांना पुन्हा संधी मिळणे आधीपासूनच कठीण दिसत होते. तरीही असंतुष्ट गटातील इच्छुकांच्या शक्यता तपासल्या गेल्या. रजनी पाटील ह्या राज्यसभेत एकदा निवडून गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या जम्मू-काश्मीरमध्ये प्रभारीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
नाराजांकडे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील एकाच जागेसाठी मिलिंद देवरा, मुकुल वासनिक आणि संजय निरुपमसारखे नेते इच्छुक होते. परंतु पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्ती रजनी पाटील यांचे पारडे जड ठरले. आता मोठे राजकीय निर्णय घेताना असंतोष आणि नाराजीकडे दुर्लक्ष करण्याचे संकेतच काँग्रेसने दिला आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीचा पाठिंबा
काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. सातव यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याची चर्चा होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत आपले राजकारण बळकट करण्याच्या रणनीतीनुसार उमेदवार निश्चित करणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना योग्य वाटले. राज्यसभेची ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रजनी पाटील यांचा विजयही निश्चित मानला जात आहे.