इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. लाल डायरीद्वारे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानिमित्ताने गुढा आणि लाल डायरी प्रकरण आता चर्चेत आले आहे. आता त्याविषयी जाणून घेऊया…
कोण आहेत राजेंद्र सिंह गुढा
राजेंद्र गुढा हे उदयपुरवटी मतदारसंघाचे आमदार आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. अशोक गेहलोत सरकारमध्ये ते मंत्री होते. एके काळी गुढा हे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते, मात्र अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये अशोक गेहलोत यांनी गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्यांच्या बडतर्फीनंतर गुढा अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर गुढा यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.
असे आहे लाल डायरी प्रकरण
राजेंद्र गुढा यांनी ‘लाल डायरी’प्रकरण बाहेर काढले. गुढा म्हणाले होते की, त्यांच्याकडे लाल डायरी आहे, ज्यामध्ये अशी अनेक गुपिते आहेत, ज्यामुळे अशोक गेहलोत यांना तुरुंगात टाकता येईल. गुढा यांनी आरोप केला आहे की- ‘धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर ईडी आणि आयकरने छापा टाकला होता. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या आदेशानुसार मी ज्या ठिकाणी छापा टाकला होता तिथून लाल डायरी काढली होती. मी लाल डायरी बाहेर काढली नसती तर मुख्यमंत्री गेहलोत तुरुंगात गेले असते. विधानसभेत मंत्र्यांनी मला मारहाण करून लाल डायरीचा अर्धा भाग हिसकावून घेतल्याचा आरोप राजेंद्र गुडा यांनी केला आहे. पण तरीही माझ्याकडे अद्याप लाल डायरीचा अर्धा भाग आहे. ही सर्व गेहलोत सरकारची काळी कृत्ये आहेत. गुढा यांच्या आरोपानुसार, लाल डायरीमध्ये राजकीय फायद्यासाठी आमदारांना आमिष दाखवणे, क्रिकेट निवडणुकीत पैसे देणे, घोडे बाजार करणे, वेळेप्रसंगी लोकप्रतिनिधींना खरेदी करणे असे खळबळजनक आरोप आहेत. राजस्थान विधानसभेत मला २५ ते ३० जणांनी मारहाण केल्याचा आरोप गुढा यांनी केला. येत्या काळात गेहलोत सरकारची अनेक गुपिते उघड करणार असल्याचा इशारा गुढा यांनी केला.
Politics Rajasthan Lal Diary Case Rajendra Singh Gudha
Eknath Shinde Shivsena Udayprurvati Ex minister MLA