पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पुणे येथील सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात मी पहिल्यांदाचा अजित पवारांसोबत एका मंचावर असल्याचे सांगत मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होते अशी जोडही त्याला दिली.
या कार्यक्रमात अगोदर भाषण करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोदी आणि शहांचं तोंडभरुन कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, अमित शहा हे गुजरातचे आहेत, पण त्याचं महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. यावेळी त्यांनी प्रेम असल्याचं कारण सांगितते. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं. हे अमित शहांच्या रूपाने ही पाहायला मिळतं. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झाल्याची पुष्ठीही त्यात जोडली. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित शहांनी करुन दाखवले. त्यामुळे आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी ” या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
असे आहे नवीन पोर्टल
नवीन पोर्टल एमएससीएस कायदा, २००२ आणि त्याच्या नियमांमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या सुधारणांचाही समावेश करेल. पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक वर्क फ्लोद्वारे अर्ज/सेवा विनंत्यांसंबंधी प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने हाताळली जाईल. हा संगणकीकरण प्रकल्प नवीन एमएससीएसच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांचे कामकाज सुलभ बनवेल.
पोर्टल डॅशबोर्ड तयार करणार
देशात १५५० हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, २००२ च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय निबंधक कार्यालय जबाबदार आहे. बहु-राज्य सहकारी संस्थांचे सर्व कामकाज सुलभ करण्यासाठी आणि नवीन बहु-राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसह डिजिटल व्यवस्था तयार करण्यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे. नव्याने विकसित केंद्रीय निबंधक कार्यालय पोर्टल डॅशबोर्ड तयार करण्यासाठी युवकांचा सहभाग आणि कल्पना आमंत्रित करण्यासाठी ‘हॅकेथॉन’ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.
politics pune amit shah praise ajit pawar
NCP BJP