पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असतांना शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शाह यांची जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलात भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यासाठी शाह यांनी हिरवा कंदिल दिला असून पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ही भेट ४० मिनिटे झाली. यात मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच राज्यातील राजकीय घडामोडीबाबत चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गट व भाजपच्या मंत्री बनण्याची संधी लांबणीवर पडली होती. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तारात भाजप, शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळणार आहे. नव्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार तर अजितदादा गटाला दोन मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता या विस्तारात संधी मिळावी म्हणून इच्छुकांची पुन्हा लॉबिंग सुरू होणार आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होणार असल्याचे अगोदर बोलले जात होते. पण हिवाळी अधिवेशन संपूनही हा विस्तार झाला नाही. आता नवी विस्तारात कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
politics pune amit shah meet eknath shinde devendra fadnavis ajit pawar
cabinet expansion discussion