विशेष प्रतिनिधी, मुंबई
राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई गाठली तेव्हापासून राजकीय वातावरण तापले आहे. विविध चर्चा सुरू आहेत. राजकीय तज्ज्ञ अंदाज व्यक्त करीत आहेत. अश्यात या दोघांची भेट भाजपच्या विरोधात सिक्रेट प्लॅन तयार करण्यासाठी झाली होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रशांत किशोर यांना रणनितीकार म्हणून नियुक्त केलेले नाही, असे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी भाजपला देशपातळीवर मात देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांचा मोर्चा तयार होऊ शकतो, असेही संकेत त्यांनी दिले आहेत. प्रशांत किशोर यांनी पवार यांना सांगितले की, ‘देशात जवळपास ४०० लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे भाजपचे विरोधक चांगली कामगिरी करीत आहेत. अश्यात प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन भाजपला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात.’
२०१४ च्या निवडणुकीपासून काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की कितीही नेतृत्व बदलले तरी आता भाजपला एकट्याने टक्कर देण्याची शक्ती त्यांच्यात राहिलेली नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनाच भाजपच्या विरोधात उभे करणे हा एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यासाठी एका विश्वासू चेहऱ्याची गरज आहे आणि शरद पवार यांच्याकडे त्यादृष्टीने बघितले जाते. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना झाला तर भाजपच सत्तेत येईल. त्यामुळे तिसरा पर्याय देशाला देण्याची गरज आहे, असे प्रशांत किशोर यांनी पवारांना सांगितले.
मोठ्या घडामोडी नाही – राऊत
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पवार–प्रशांत किशोर यांची भेट मोठ्या घडामोडींचे संकेत वगैरे देत नाही, असे म्हटले आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी शिवसेना आणि काँग्रेससाठीही काम केले आहे. त्यामुळे एका पक्षाच्या प्रमुखाला भेटले आहेत तर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली असेल. यातून काही मोठ्या घडामोडींची शक्यता मुळीच नाही, असेही राऊत म्हणाले.
येणार तर मोदीच – फडणवीस
कितीही रणनिती तयार केली तरीही देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पवार–प्रशांत भेटीनंतर दिली आहे. देशात लोकशाही आहे. कोणीही कोणालाही भेटू शकतो. पण देशवासीयांच्या मनात मोदींनाच स्थान आहे, असेही फडणवीस म्हणाले.