इंडिया दर्पण ऑनलईन डेस्क – औरंगजेबाच्या नावाने राज्यात सुरू असलेल्या घमासान आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी थेट संभाजी महाराजांच्या मृत्यूवर भाष्य केले आहे. संभाजी महाराजांंना मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा देण्याचा सल्ला आबा भटजी यांनी दिला होता, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
संभाजी महाराज यांच्या हत्येमध्ये हिंदूंचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी एका पुस्तकाचा दाखला देत म्हटले आहे. ‘नाशिकमध्ये कडू नावाचे लेखक आहेत. औरंगजेब आणि मनुवाद या संदर्भात त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये संभाजी महाराजांना झालेल्या शिक्षेचा दाखला आहे. औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी होते. संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी? हे त्यांनीच सुचवले होते, असा उल्लेख आहे. मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांना शिक्षा देण्यात यावी, असा सल्ला भटजींनी दिला होता.
महाराजांना शिक्षा देताना भटजींचा सल्ला अमलात आणला गेला, असं मी मानतो.’ देशात सध्या जुन्या राजांची उदाहरण देऊन दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता, यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं. जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद येणार नाही आणि देशाचे स्वातंत्र्य जाणार नाही, असेही ते म्हणाले.
औरंगजेबाला माहिती दिली कुणी?
संभाजी महाराज संगमेश्वर येथे गुप्त मोहिमेवर होते, असे मानायला हरकत नाही. या मोहिमेची माहिती औरंगाजेबपर्यंत कशी पोहोचली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्याप्रकारे देहदंड दिला, तो निंदनीयच आहे. त्याची आम्ही निंदा करतो. पण महाराजांना पकडून नेणारेही जगापुढे आले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काय होता करार?
‘पिलाजीराव शिर्के यांचा शिवाजी महाराजांबरोबर एक करार झाला होता. पिलाजीराव हे योद्धा होते. महाराजांनी त्यांना कोकणात हरवलं होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे महाराजांनी त्यांची सर्व जमीन आणि मालमत्ता काढून घेतली. तुम्हाला मुलगा झाल्यास मुलाला जमीन परत मिळेल, असा शब्द राजांनी दिला. पिलाजीरावांच्या मुलाचे नाव गणोजी शिर्के. दरम्यानच्या काळात महाराजांचे निधन झाले आणि संभाजी महाराज सत्तेवर आले. संभाजी महाराज हा करारनामा पाळतील, असा विश्वास गणोजी शिर्के यांना वाटला नाही,’ असाही दाखला आंबेडकरांनी दिली.