नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार बच्चू कडू यांचे नेहमी नेहमी नाराज होणे शिंदे-फडणवीस सरकारने हलक्यात घेणे महागात पडू शकते, असे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. बच्चू यांनी मंत्रीमंडळ विस्ताराच्या बाबतीत आता सरकारकडून अपेक्षाच सोडली आहे, या शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक तोंडावर असताना बच्चू यांचे नाराज होणे सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्येही काम केले. तेव्हाही त्यांना मंत्रीपदाने हुलकावणीच दिली. विशेष म्हणजे त्यांनी सरकारसोबत आहोत म्हणून बुक्क्याचा मार सहन केला नाही. वेळोवेळी सभागृहात आणि बाहेरही आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आले. शिंदे-फडणवीस सरकारमध्येही त्यांनी त्याच भूमिकेवर काम सुरू ठेवले आहे. मुळात त्यांची नाराजी मंत्रीमंडळ विस्तारावरून आहे. आणि आता त्याचे परिणाम पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर दिसण्याची शक्यता आहे. तसे संकेतही त्यांनी दिले आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. यावरून ‘आता मंत्रीमंडळ २०२४ नंतरच होईल’, अश्या कोट्या बच्चू कडू बैठकांमध्ये करीत असतात. शिंदे गटासह सरकारमध्ये सामील झालेल्या सर्व आमदारांनी आता मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा करण्यापेक्षा आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या, असा सल्ला देऊन बच्चू कडू यांनी विस्ताराच्या बाबतीत सरकारकडून कुठलीच अपेक्षा उरलेली नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
स्वतंत्र लढणार
सरकारमध्ये सामील होताना आम्ही स्वतंत्रपणे निवडणुक लढवू शकत नाही, असा काही करार झालेला नाही. पंचायतसमिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्र लढविण्याचाही करार झालेला नाही. त्यामुळे आम्ही कोकण, अमरावती, नागपूर, मराठवाडा आणि नाशिक येथील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही प्रहार संघटनेचे उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला पाचही जागा लढवायच्या आहेत, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
दंड थोपटले
बच्चू कडू यांचे नाराज होणे कोणत्याच सरकारला नवे नाही. पण आता ते ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत, त्यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत, असे दिसत आहे. मंत्रीपदाच्या आशेने ते शिंदेंसोबत आले असावेत आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा संताप झाला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला लागली आहे.
Politics Prahaar Chief Bacchu Kadu on Cabinet Expansion nervous
Shinde Fadnavis Government Alliance