अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कधी शरद पवार तर कधी अजित पवार गटाचे नेते आपल्या विधानांमधून कायमच महाविकास आघाडीतील लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात झालेल्या सभेत शरद पवारच आमचे नेते आहेत आणि फोटो वापरायलाही काहीच हरकत नाही, असे म्हटले होते. आता तर त्यांनी आपण रोजच साहेबांच्या संपर्कात असल्याचे सांगून भलतेच वळण दिले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आणि ते भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव, पक्षाचे चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटो या तीन गोष्टी सोबत नेल्या. त्याचा वाद न्यायालयात जाईल, निवडणूक आयोगाकडे जाईल आणि मग पुन्हा शिवसेनेसारखे प्रकरण बघायला मिळेल, अशी शंका वाटत असतानाच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आमच्या पक्षात कुठलीही फुट पडलेली नाही, अशी विधाने वारंवार केली. एवढेच नव्हे तर असल्या घटनांनी आमच्या कौटुंबिक संबंधांमध्ये कुठलीही वितुष्टता आलेली नाही, असाही दावा केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना शरद पवारांना सोबत घ्यायचे की नाही, हेच कळत नाहीये.
शिवाय अलीकडेच झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला शरद पवार यांची उपस्थिती असल्यामुळे ते भाजपच्या विरोधातच आहेत, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पण आता शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोटच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी हे मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. शरद पवार साहेब यांच्या बदल असलेला आदर आजही कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असं प्रपुल्ल पटेल यांनी सांगितलं.
शरद पवार यांनी मला १९७८ साली बोलवून घेतले होते. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांचे हे विधान विरोधकांसाठी संकेत आहे ही भाजपला इशारा आहे, याबाबत मात्र वेळच सांगेल.
तो निर्णय राज्याच्या हितासाठी
२०१९ मध्ये सत्तेसाठी आपण शिवसेनेसोबत गेलो. आपण संधी साधली आणि राज्याच्या विकासासाठी निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले. आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे. जेव्हा निकाल येईल तो आमच्या बाजूने लागेल. पक्ष आम्हाला मिळेल. चिन्ह आम्हाला मिळेल. अजित पवार कुठल्याही बाबतीत तडजोड करणारा माणूस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Politics Praful Patel Statement NCP Sharad Pawar Confusion