मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी (३० मे) शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी आपली मालमत्ताही जाहीर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ३४० कोटींची तर भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांच्याकडे १०० कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने आणि जाणते शिलेदार आहेत. त्यांनी २०१६ मध्येसुद्धा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना मालमत्ता विवरण भरणे अनिवार्य आहे. त्यानुसार तेव्हा त्यांची २५२ कोटींची मालमत्ता होती. गेल्या सहा वर्षात त्यात १८८ कोटींची भर पडली आहे.
आता भरलेल्या मालमत्ता विवरणानुसार, प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर घरे, जमीन, व्यापारी संकुल अशी मिळून ७५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर १०४ कोटी ५६ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. एकत्रित कुटुंबाच्या नावावर १०७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
त्यांच्या नावावर १४ कोटी ३६ लाखांची तसेच पत्नीच्या नावावर ३४ कोटी १२ लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या एकत्रित कुटुंबाची जंगम मालमत्ता ८० कोटींच्या आसपास आहे. पटेल यांच्याकडे १ कोटीचे, तर पत्नीकडे ६ कोटी ४४ लाखांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही. त्यांच्याकडे १४ कोटींचे दायित्व आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मालमत्तेतही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षात गोयल यांची मालमत्ता ९० कोटींवरून १०० कोटींच्या वर गेली आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांचे वार्षिक उत्पन्न ३८ लाखावरून ६२ लाखांवर गेले आहे. गोयल दाम्पत्याकडे पुणे, मुंबईत घर, व्यापारी गाळे अशी मिळून सुमारे २१ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
गोयल यांच्याकडे २९ कोटींची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ५० कोटींची जंगम मालमत्ता आहे. गोयल दाम्पत्याकडे साडेसात किलो सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तसेच शेअर बाजारात विविध कंपन्यांचे ७ कोटींचे शेअर्सही आहेत. टोयोटा करोला, अल्टीस, टोयोटा कॅमरीच्या दोन अशा ८३ लाखांच्या चारचाकी आहेत.