मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांचा शिवसेनाप्रवेश चांगलाच गाजतोय. मुलाचा निर्णय क्लेषदायक असल्याची भावना सुभाष देसाई व्यक्त करत असताना ठाकरे गटातून शिंदे यांच्यावर नेत्यांची मुले पळविण्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा पक्षप्रवेश भाजपलादेखील खटकला असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये धुसफुस सुरू झाल्याची माहिती आहे. भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशावर भाजपा गोरेगाव विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
सामाजिक क्षेत्रात कवडीचेही योगदान नसलेल्या व्यक्तीला पक्षात घेऊन काहीही उपयोग नसल्याचे सांगत भाजपने भूषण देसाईंवर टीकास्त्र सोडले आहे. ‘भूषण देसाई यांचे सामाजिक क्षेत्रात एक इंचाचेही काम नाही. भ्रष्टाचाराने हात बरबटलेले व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे गोरेगावकरांच्या भावना तीव्र आहेत. या पक्षप्रवेशाला आमचा विरोध आहे. अशा भ्रष्ट व्यक्तीला पक्षात घेतले त्याचा धोका मित्रपक्षालाही होऊ शकतो, असा आरोप भाजपा गोरेगाव विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी केला आहे.
सुभाष देसाई भावूक
‘माझा मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरू ठेवणार आहे,’ अशी भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
Politics Party Join BJP Shivsena Shinde Group Disappointment