बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा एकेकाळी बीडच्या राजकारणात दबदबा असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात होते. परंतु कालांतराने पंकजा मुंडे राजकारणात आल्याने आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. तर, भाजपचे तत्कालीन धडाडीचे कार्यकर्ते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या सख्या – चुलत भावा – बहिणींमध्ये जणू काही विस्तव जात नव्हता. मात्र, आता दोघांमधील संघर्ष संपल्याची जोरदार चर्चा आहे.
अलीकडच्या काळात दोघांमध्ये पुन्हा एकदा समेट घडून सुसंवाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. पुर्वी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध सुरू असे. यापूर्वी अनेक वेळा धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे व्यासपीठावर काही वेळा एकत्रित आले असले तरी आज मात्र त्यांच्यामध्ये होणारा संवाद हा प्रकार सगळ्यांसाठीच नवीन होता. कारण अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष असलेल्या बहीण भावामध्ये अपवादानेच इतका वेळ संवाद पाहायला मिळाला होता. त्यामुळे बीडमधील मुंडे बहीण-भाऊ यांच्यातील सत्ता संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सहा वर्षानंतर एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर कमी होत असल्याची चर्चा होत आहे.
त्यांच्यातील संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी म्हटले की, माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असे म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याचे संकेत दिले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून दादही देखील दिली. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झाले.
तसेच पंकजा पुढे म्हणाल्या की, आम्ही दोघेही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा. त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा पण शक्ती सारखी आहे. दोघे एकाच पाठीवर जन्माला आलो आमचे भविष्य काही वेगळे असेल. त्यासाठी काही वेळ वाट पाहा, असे सूतोवाचही त्यांनी केले. विशेष म्हणजे यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही प्रमाणात अंतर या सप्ताहात कमी झाले आहे, असे म्हटले जाते. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय निर्माण करण्याचे कारण नाही. असे म्हणत गडाच्या वादावर ही पूर्णविराम दिला.
तर मोठा भाऊ या नात्याने माझ्या लहान बहिणीने भगवानगडासाठी जे करायला सांगितले आहे. ते मी सर्व करेन. आमचे एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही. राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत, असे सांगितले. त्याच वेळी सभेतून एकाने त्यांना दोघांनीही एकत्र यावे, अशी मागणी केली. यावर देखील धनंजय यांनी राजकीय गणित मांडले. ते म्हणले, पंकजा दोन वेळेस आमदार राहिल्या. त्या मंत्री झाल्या. त्याच पद्धतीने मी आमदार झालो. विरोधी पक्षनेता झालो आणि मंत्रीही झालो. जर आम्ही वेगळे झालो नसतो तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, आता तुम्ही समजून घ्या, म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत, असे संकेत दिले. त्यामुळे आता पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Politics Pankaja and Dhananjay Munde Dispute