इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. ज्यामध्ये २६ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ही बैठक महत्त्वाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चेहरा असणार आहेत. मोदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल. तर, आता २६ विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव इंडिया (INDIA) असे ठेवले आहे. म्हणजेच, २०४चा सामना मोदी विरुद्ध टीम इंडिया असा होणार आहे.
विरोधी पक्षांचे बहुतेक नेते सोमवारी सायंकाळपर्यंत बंगळुरूला पोहोचले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी संध्याकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले होते. शरद पवार मेजवानीला हजर राहिले नव्हते. ते आजच्या सभेला हजेर आहेत. राष्ट्रीय जनता दलाने ट्वीट करुन सांगितले आहे की, विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया असे असेल. प्रियांका चतुर्वेदी, मणिकम टागोर, डेरेक ओब्रायन, आरजेडी यांच्या हँडलवरून इंडिया हे नाव निश्चित झाल्याचे ट्विट करण्यात आले आहे.
विरोधी पक्षांची युती म्हणजे भारताचे प्रतिबिंब असा त्याचा अर्थ आहे.
I – Indian (भारतीय)
N – National (राष्ट्रीय)
D – Democratic (लोकशाही)
I – Inclusive (सर्वसमावेशक)
A – Alliance (आघाडी)
खरगे म्हणाले की, राज्य पातळीवर आमच्यात काही मतभेद आहेत, पण हे मतभेद वैचारिक नाहीत. हे मतभेद इतके मोठे नाहीत की आपण त्यांना विसरून सामान्य माणूस, गरीब, तरुण आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी पुढे जाऊ शकत नाही. आमच्याकडे 26 पक्ष आहेत आणि 11 राज्यात आमची सरकारे आहेत. एकट्या भाजपला 303 जागा मिळू शकत नाहीत. ते आपल्या मित्रपक्षांच्या मतांचा वापर करून सत्तेवर येते आणि नंतर त्यांना टाकून देते. आज भाजपचे अध्यक्ष आणि त्यांचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपल्या जुन्या साथीदारांना एकत्र करण्यात व्यस्त आहेत.
बैठकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ‘मी चेन्नईतही म्हटले होते की, काँग्रेसला सत्तेत किंवा पंतप्रधानपदात रस नाही. आपली राज्यघटना, लोकशाही, सहिष्णुता आणि सामाजिक न्याय वाचवण्यासाठी ही सभा आहे. खरगे म्हणाले की, विरोधकांच्या विरोधात प्रत्येक संस्थेचा अस्त्र म्हणून वापर केला जात आहे. सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाचा वापर केला जात आहे. आमच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कायदेशीर प्रक्रियेत अडकवले जात आहे. आपल्या खासदारांना बरखास्त करण्यासाठी घटनात्मक अधिकाराचा वापर केला जात आहे. सरकार पाडता यावे म्हणून आमदारांना ब्लॅकमेल केले जात आहे किंवा त्यांना लाच दिली जात आहे.