मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे वारे सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. विधानपरिषदेच्य उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे.
ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या निर्णयाने शिंदे गटाचे बळ वाढले असून विधानपरिषदेतील त्यांचे महत्त्व यामुळे अधिक मजबूत झाले आहे. पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. आपली कोणतीही नाराजी नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र, त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे.
महत्त्वाचे म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितले जाते. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखात शिवसेना योग्य मार्गावर जात असून त्यांच्यासोबत मी जात आहे. १९९८ साली मी बाळासाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतली. राम मंदिर, ट्रिपल तलाख, ३७० कलम यासारखे अनेक निर्णय एनडीएने घेतले. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व यावर हा पक्ष पुढे जात आहे, असे त्या म्हणाले. तसेच ठाकरे गटाबाबत बोलताना,‘पक्षावर माजी नाराजी नव्हती. सटरफटर लोक आल्याने नाराजी होत नसते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हणून गेल्या शिंदे गटात
नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना अविश्वास ठराव आणला होता. उपसभापती असलेल्या गोऱ्हे या आम्हाला बोलू देत नाहीत, असा आरोप आमदारांनी केला. या ठरावामुळे गोऱ्हे यांचे पद अडचणीत आले असते. आता त्या शिंदे गटात आल्या आहेत. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. त्यात आमदार प्रवीण दरेकर यांनी तसा प्रस्ताव मांडला. आणि त्याला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिले आहे.
फडणवीसांची उपस्थिती का
गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी तेथे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का उपस्थित होते असा प्रश्न विचारला जात आहे. याविषयी त्यांनाही विचारण्यात आले. फडणवीस म्हणाले, शिवसेना आणि भाजप ही इमोशल युती आहे. गेली २५ वर्ष आम्ही एकत्र आहोत. आम्ही विचाराने आणि मनाने एक आहोत. तसेच नीलम गोऱ्हे यांचा प्रवेश होत आहे. नीलमताई आणि आमचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे सहाजिकच माझी इच्छा होती की, या पक्षप्रवेशाला उपस्थित राहावे. नीलमताईंना शुभेच्छा द्याव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याप्रमाणे नीलमताई दुसऱ्या पक्षातून प्रवेश करत नाहीत. तर खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू आहे आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताई यांनी या पक्षात प्रवेश केला. नीलमताई यांनी विचार करून हा निर्णय घेतला आहे. सगळ्यांच्या वतीने नीलमताईंचे मनापासून अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी सांगितले.