मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल अशा दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुळे यांची पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
सुळे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, असे सुळे यांनी म्हटले आहे.
Politics NCP Supriya Sule Selection Reaction