मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली अध्यादेशाशी संबंधित विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेषतः ‘इंडिया’ या नावाने एका छताखाली आलेल्या विरोधी पक्षांच्या मनात राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून धाकधूक आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांची खासदारकी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
दिल्ली अध्यादेशाला राज्यसभेत मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी मोहीम राबवली आहे. पण विरोधकांचे नेतृत्व ज्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे त्या शरद पवारांच्याच भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. राज्यसभेत शरद पवार यांचा व्हिप चालणार आहे, तर लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व आहे. पण अजित पवार यांच्या गटाचे नेते सुनील तटकरे लोकसभेत खऱ्या राष्ट्रवादीचा दावा करण्याची शक्यता आहे. आणि त्यानुसार आपलाच व्हिप लागू होईल, असेही सांगण्याची शक्यता आहे. पण त्यांच्याकडे व्हिप लागू करण्यासाठी केवळ एकच खासदार गळाला लागलेला आहे.
इतर चार खासदारांनी शरद पवारांवरील निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या व्हिपनुसार कार्यवाही झाली नाही, तर तटकरेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे आहेत. यावेळी व्हीप जारी केल्यानंतर खासदार तटकरे यांची भूमिका विधेयकाच्या बाजूने राहते की, विरोधात राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्हीप न मानल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अजित पवार गटाला अद्याप वेगळा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीपच न काढल्यास त्यांचा बचाव होऊ शकतो.
राष्ट्रवादी कुणाची?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने कोणत्या गटाचा व्हीप वैध राहील, हा मुख्य प्रश्न राहणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे दिल्ली विधेयकावर कुणाला मतदान करणार यावरुन देखील राष्ट्रवादी कुणाची हे स्पष्ट होणार आहे. दोन्ही गटांच्या खासदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.