औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजितदादांनी राष्ट्रवादीत केलेले बंड आणि पवार कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले संबंधत यामध्ये सरमिसळ होणार नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे ‘मी कुटुंबात राजकारण आणत नाही’, असे म्हणत दादांच्या बंडामुळे परिवारात कटुता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेत्यांसह बाहेर पडून सत्तेत स्थान मिळविणाऱ्या अजित पवार यांच्यामुळे पवार कुटुंबातील संबंधांवर कुठला परिणाम होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र, दोन्ही बाजूने कुटुंब आणि राजकारण वेगवेगळे असल्याचे सांगत गाठीभेटी सुरू आहेत. बंडानंतर काही दिवसांतच अजित पवार हे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेटायला गेले होते. त्या भेटीचे राजकीय संदर्भ लावण्यात येऊ नये, मी काकीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो, असे अजित पवार तेव्हा म्हणाले होते. त्यानंतर काका-पुतण्यांध्ये कधी चोरीचोरी चुपके चुपके तर कधी खुलेआम भेटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे संभाजीनगरातील वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
शरद पवार म्हणाले,‘पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी घरात राजकारण आणत नाही. प्रा. एन. डी पाटील चळवळीतील नेते होते. एकेकाळी मंत्री होते. त्यांची बायको ही माझी सख्खी बहीण आहे. आम्ही सभागृहात एकमेकांविरोधात होतो. पण घरात कौटुंबिक कार्य असेल तर आम्ही घरी जायचो. माझ्या बहिणीचे पती विरोधी पक्षातील, आम्ही नाते तोडले का? उद्या अजित पवारांच्या घरात २ मुले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही ठरले तर मला विचारणा होणारच ना. आम्ही भाजपाविरोधात आहोत. भाजपासोबत जे असतील त्यांचा आमचा संबंध नाही.’
बिहार, कर्नाटकात घेणार सभा
देशाची सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात आहे. त्यांची भूमिका समाजात एकता टिकवून ठेवण्याची आहे, पण ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत. मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात २ सभा घेणार आहे. बिहार आणि कर्नाटकात मी सभा घेणार आहे.’
Politics NCP Sharad Pawar Press Conference
Aurangabad Sambhaji Nagar Ajit Pawar Secret Meet