मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यायची हे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं – माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्यमहोत्सव षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आदरणीय शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज राष्ट्रवादी पक्ष व त्याचा प्रत्येक कार्यकर्ता शक्तीने एकजुटीने वेगवेगळे वातावरण संघटनेमार्फत करतोय कारण देशातील लोकशाही, व्यवस्था या सगळ्यासंबंधी त्याकडे बारकाईने लक्ष देऊन एकसंघ समाज कसा राहिल याची काळजी घेत आहे. या प्रयत्नांची आज गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.
ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करण्याचे काम होत असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
लोकांनी शक्ती दिली, सत्ता दिली आणि २५ वर्षात अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे असे आवर्जून सांगतानाच कामगार, तरुण, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, भटक्या विमुक्त, यांचा विचार करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून याची नोंद राज्यातील जनतेच्या अंतःकरण झाली ही केवळ तुमच्या कष्टामुळे करता आली असे कौतुकही शरद पवार यांनी केले.
राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकरी याला फार महत्व दिले पाहिजे. हातामध्ये सत्ता असताना याचा वापर केला पाहिजे. शेतीप्रधान देश असताना या देशामध्ये परदेशातून धान्य आयात करण्याची स्थिती बदलली पाहिजे. हे एक आव्हान स्वीकारले आणि एका ठराविक काळामध्ये देशाची गरज भागवली पण जगातील अनेक देशात अन्नधान्य पुरवण्याचे काम केले याची नोंद संबंध देशाने घेतली याची आठवणही शरद पवार यांनी करुन दिली.
आज चित्र काय वेगळे दिसते आहे. आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दुखावलेला आहे. शेतीमालाच्या किमती योग्य पध्दतीने मिळत नाही. कांदा, कापूस असो आज खान्देश मराठवाडामध्ये शेतकरी कापूस साठवून ठेवत आहे. ही परिस्थिती याअगोदर नव्हती. संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. मोदींनी तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करु सांगितले पण केले नाही मात्र दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या आहेत. आज गेल्या पाच महिन्यात राज्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या होतात ही अवस्था राज्यात आहे याबद्दल तीव्र नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.
राज्यकर्त्यांची कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी असते मात्र महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. शांतताप्रिय अशी ओळख राज्याची असताना सत्ताधारी सत्ता नाही त्याठिकाणी राग काढण्याचा प्रकार करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठीक नसेल तर दंगली स्वरुपात त्याची किंमत मोजावी लागते. लहान घटकांना संरक्षण द्यायचे असते परंतु आज महिलांची काय परिस्थिती आहे. २३ जानेवारी २३ मे २०२३ पर्यंत ३१५२ मुली व महिला गायब आहेत भगिनींचे संरक्षण करण्यात सरकार काय करतेय असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला.
राज्यकर्त्यांना एक खबरदारी घ्यावी लागते परंतु ती घेतली जात नाहीय. मणीपूरमध्ये दंगली होत आहेत. जे घडतंय त्याकडे केंद्र सरकार ज्याप्रकारे बघतेय त्यावरून आम्ही नागरीक आहोत की नाही अशी चिंता त्यांना वाटत असेल. म्यानमारच्या सीमेवर मणीपूर आहे. चीनच्या सीमेवर काही भाग येतो आहे. त्याठिकाणी अशी परिस्थिती असेल तर काय उपयोग आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला वेळ केंद्र सरकारला वेळ नाही याबाबत नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली.
प्रत्येकाने पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. संसदेत कार्यक्रम झाला त्यात राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही. का निमंत्रण दिले नसेल तर साधी गोष्ट आहे. उद्घाटन कुणी केले मोदी यांनी. राष्ट्रपतींना बोलावले असते तर प्रोटोकॉल पाळला गेला असता आणि राष्ट्रपतींचे नाव आले असते म्हणून त्यांना न बोलवण्याचे कारण समोर आले आहे.माझं नाव त्याठिकाणी असलं पाहिजे. दुसरं कुणाचं चालणार नाही याच्याशिवाय दुसरं कारण नाही असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र मेहता, राष्ट्रीय प्रवक्ते नसिम सिद्धीकी, क्लाईड क्रास्टो, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, आदींसह आमदार, माजी खासदार व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.