मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे यांच्या नेतृत्वातच बंड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार गटासह शरद पवार यांनी आता पक्षावर पकड मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात आता शरद पवार राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहेत. तसेच, जनतेचा पाठिंबा आपल्या बाजूने मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.
शरद पवार यांनी त्यांचे पहिले टार्गेट छगन भुजबळ यांना केले आहे. त्यामुळेच भुजबळांच्या येवला मतदारसंघात पवार यांची पहिली सभा होणार आहे. याच सभेपासून त्यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. येत्या ८ जुलै रोजी ही सभा येवल्यात होणार आहे. या सभेत पवार हे काय बोलणार, भुजबळांना कसे लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्ह्यात दौरा सुरू होणार आहे. हा झंझावात नाशिक जिल्ह्यातून सुरु होईल. त्याअगोदर दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली की हा महाराष्ट्रभर दौरा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकनंतर धुळे आणि जळगाव येथे सभा होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पवार यांची सभा होणार आहे. कारण, तेथील आमदार अनिल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पवार हे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात लक्षकरणार आहेत.
पाटील म्हणाले की, शरद पवार यांचा संपूर्ण दौरा लवकरच जाहीर केला जाणार आहे. पाऊस असो अथवा नसो पवारसाहेब बाहेर पडणार आहेत. सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले त्याचपद्धतीने महाराष्ट्रात स्वागत जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील पुढे म्हणाले की, कुणी काही म्हणो, मीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. पवारसाहेब जोपर्यंत म्हणत नाही बाजूला हो तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही. ५३ आमदार आमच्याकडे आहेत त्यापैकी ९ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ वजा ९ हे जे आहे ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना वेगळ्या गटात टाकू नये,त्यांना वेगळी प्रलोभने दाखवू नये, त्यांच्यावर दबाव टाकू नये, सगळ्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु द्यावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.