मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट नाहीत. तसेच कुठलाही वाद नाही, असे पत्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यांच्या या पत्राने नवीन चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी निवड केल्याचे म्हटलं होते. निवडणूक आयोगानेही अजित पवारांच्या पत्रानंतर शरद पवार गटाला पत्र पाठवून म्हणणं मांडण्यास सांगितले होते. आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर पाठवले आहे. त्यात म्हटलंय की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा करणे अकाली आणि दुर्दैवी आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळावी असं शरद पवार गटाने सांगितले आहे. शरद पवार गटाने तर्क लढवला की, अजित पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत २ गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
राष्ट्रवादीत कुठला वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजित पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. १.०७.२०२३ च्या आधी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी पक्षाविरोधात कुठलीही तक्रार दिली नव्हती. त्याचसोबत शरद पवार अथवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांच्या बैठकीत त्यांनी विरोध केला होता असा युक्तिवाद शरद पवार गटाने मांडला आहे.
शरद पवारांचे निकटवर्तीय राहिलेले प्रफुल पटेल यांनी अनेकदा मीडियासमोर हा आमच्या पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य करणार नाही असं म्हटलं. शरद पवार हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर करून आम्हाला आशीर्वाद द्यावेत या मागणीसाठी दोनदा अजित पवारांसह सर्व नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे या दोन्ही गटात भविष्यात समझौता होणार का हे पाहणे गरजेचे आहे.
शिंदेप्रमाणेच अजितदादांचा दावा
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे. कारण पक्षातील बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
Politics NCP Sharad Pawar letter Election Commission
Nationalist Congress Party Ajit Pawar Factions Petition