मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वत:ची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी बराच काळ कारमध्ये ताटकळत बसून राहावे लागले. त्याचे झाले असे की, ते राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता कार्यालयाची चावी हरविल्याचा प्रकार घडला आणि दादांना अक्षरश: कारमध्ये एसीची हवा खात बसून रहावे लागले. या निमित्ताने इतरांना दम भरणाऱ्या दादांवर ‘और चाबी खो जाए…’ म्हणत डोक्यावर हात ठेवयाची वेळ आली.
शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही राष्ट्रवादीवर स्वत:चा हक्क सांगितला. शरद पवार यांनी काल कराड येथे दिवंगत मुख्यमंत्री तसेच त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दौऱ्याचा धडका लावला आहे. तर अजित पवार यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आमदार, खासदारांना गोंजारत नवीन संघटनात्मक पदांची घोषणा केली आहे. काल त्यांनी त्या अंतर्गत प्रदेशाध्यक्ष, प्रवक्ता, महिला आघाडीच्या अध्यक्ष आदींची घोषणा केली. त्या पाठोपाठ त्यांनी शरद पवारांसोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचादेखील आदेश काढला. त्यापाठोपाठ आता अजितदादांनी नवीन कार्यालयांचा धडाका लावला आहे. अशातच मुंबई येथील पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी घडलेल्या प्रसंगाने चांगलाच गोंधळ उडाला.
महाराष्ट्रामध्ये रविवारपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांना धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला असून, आज मुंबईमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उदघाटन केलं. मात्र या कार्यालयाच्या उदघाटनाला आले असताना अजित पवार यांचा काही काळ खोळंबा झाला. अजित पवार ज्या कार्यालयाचं उदघाटन करण्यासाठी आले त्या कार्यालयाची चावीच हरवली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या टिमला बराच काळ कार्यालयाबाहेर ताटकळत राहावे लागले. या बंगल्यामध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे राहायचे आणि त्यांचे पीए चावी घेऊन बेपत्ता झाले असल्याचा दावा करण्यात आला.
धक्के मारून उघडला दरवाजा
चावी हरविल्यामुळे कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती. चावी मिळत नसल्याचे पाहत या कार्यकर्त्यांनी थक्के मारून दरवाजा उघडला. त्यानंतर सर्वजणांनी नव्या कार्यालयात प्रवेश केला.