नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीनामानाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वर्क मोडवर आले आहेत. पक्षाची बांधणी आणि २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी काम सुरू केले आहे. या अंतर्गत नाशिक येथील जागावाटप आणि इतर बाबींची जबाबदारी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देण्याऐवजी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीत खऱ्या अर्थाने भूकंप आला आहे.
नाशिक म्हणजे छगन भुजबळ अशीच प्रतिमा राष्ट्रवादीत आहे. शिवसेना ते राष्ट्रवादी असा प्रवास राहिलेल्या भुजबळांचे राजकीय ज्ञान जबरदस्त आहे. ओबीसी समाजावर त्यांची पकड आहे. नाशकात त्यांच्या शब्दाला मान आहे. क्षेत्र कुठलेही असो छगन भुजबळांशिवाय पान हलत नाही, अशी स्थिती आहे. अशात नाशिकची धुरा मुंडे यांच्याकडे देण्याचा निर्णय सर्वांनाच धक्का देऊन गेला आहे.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी घटक पक्षांनी आपआपल्या बळावर तयारी सुरू केली आहे. अशावेळी राष्ट्रवादीत तर सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. पक्षाच्या अलीकडेच पार पडलेल्या बैठकीत अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांची जबाबदारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर हे मराठवाड्याला जोडून त्याची जबाबदारी धनंजय मुंडे, विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.
पक्षांतर्गत बदलांना सुरुवात
पवार यांनी राजीनामा मागे घेतानाच राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल करणार आल्याचे स्पष्ट करत नवीन नेतृत्व तयार करण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षदेखील बदलले जाणार आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार हे सुमारे आठ वर्षांपासून या पदावर आहेत. तर दुसरे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि रंजन ठाकरे यांना सुमारे पाच ते सहा वर्षे इतका कालावधी झाला आहे.
Politics NCP Nashik Chhagan Bhujbal Responsibility