कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर लोकांचं विशेष लक्ष आहे. त्यातही माध्यमांचा तर अजित पवारांपासून राष्ट्रवादीच्या आमदार-खासदार-नगरसेवकांपर्यंत साऱ्यावंरच खास लक्ष आहे. त्यात सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्तयामुळे चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.
कराड (जि. सातारा) येथे २८ एप्रिल ते ३ मे या दरम्यान ‘शिवपूत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग आहेत. या प्रयोगाची माहिती देण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठल्याने राजकीय प्रश्नोत्तरांनीच पत्रकार परिषद गाजली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या एका भाषणाचं विशेष कौतुक केलं, हे कौतुक म्हणजे भाजपकडून आलेली अॉफर समजावी का, असा सवाल अमोल कोल्हे यांना करण्यात आला. त्यावर पंतप्रधानांनी कौतुक करणे ही अभिमानाची बाब आहे. पण ही अॉफर कशी समजावी? मुळात अॉफर तर यायला पाहिजे, असे उत्तर अमोल कोल्हे यांनी दिले. खरे तर हा प्रश्न विचारल्यावर आधी डॉ. कोल्हे हसले आणि त्यानंतर ते बोलायला लागले. लोकसभेत थेट पंतप्रधानांनी भाषणाचे कौतुक करणे यापेक्षा आनंदाची बाब कोणती असणार आहे. पण याचा अर्थ ही भारतीय जनता पार्टीकडून पक्षात येण्याची अॉफर आहे, असे कसे होणार, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.
वारं बघून नांगरायचं…
लोकसभा निवडणुक राष्ट्रवादीकडूनच लढवणार का, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अमोल कोल्हे यांनी दिलेच नाही. आधी वारं बघायचं आणि नंतर नांगरायचं, असे ते म्हणाले. त्यामुळे वारं बघूनच ते लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढवायची आणि लढवायची की नाही, याबाबत ठरवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
राजकीय पद फक्त पाच वर्षांचे
राजकारण, राजकीय पद फक्त पाच वर्षांसाठी आहे. पण महानाट्याच्या माध्यमातून शिवपूत्र संभाजी यांचे कार्य प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचणार आहे, ते शाश्वत आहे. त्यामुळे त्यासाठी पहिले काम करुया, असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
Politics NCP MP Amol Kolhe BJP Statement