मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक नेते आणि आमदार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील त्यांचे मंत्री आणि पदाधिकारी यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. आणि आता आज आमदारांसह अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. पण, शोक प्रस्तावानंतर आजचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील पदाधिकारी आणि आमदार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहचले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि आमदारांनी शरद पवार यांच्याबरोबर ४५ मिनीटे चर्चा केली.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी काल अजित पवार गट पोहोचला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ आदी यावेळी उपस्थित होते. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घेण्यात आली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले राष्ट्रवादी एकसंघ राहवा ही विनंती सर्वांनी केल्याचे सांगण्यात आले. या भेटीत शरद पवार यांनी सर्व ऐकून घेतले, पण, त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती, असे प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर सांगितले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे सर्वजण शरद पवार यांना भेटले. तर अजित पवार हे अगोदरच सिल्व्हर ओक येथे शरद पवारांना भेटले होते. अजित पवार यांची शरद पवार यांच्यासोबतची तिसरी भेट आहे. तर इतर नेत्यांची ही दुसरी भेट होती. आजच्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नेते जितेंद्र आव्हाड चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होते.
आज पटेल म्हणाले
आजच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, काल आम्ही प्रमुख नेते व मंत्री यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली. काल बहुतांश आमदार हे त्यांच्या मतदारसंघात होते. आज अधिवेशनासाठी बहुतांश आमदार आले आहेत. म्हणून आज या आमदारांसह आम्ही शरद पवार यांना भेटलो. काल आम्ही जी विनंती केली तीच आज केली आहे. शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. मात्र, आजही ते काहीच बोललेले नाहीत. आमच्या भावना आणि मागण्यांचा ते नक्की विचार करतील, अशी आम्हाला खात्री आहे