नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकारणात भूकंप होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चेचा केंद्रबिंदू प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आहेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. यासंदर्भात आता प्रफुल्ल पटेलांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज नाशकात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्हाला विकासाची आघाडी सगळीकडे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विकास व्हायला हवा. महाविकास आघाडीचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही त्याचा धसका घेतला आहे, असे ते म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहित नाही, ज्यांनी सरकार उभे केले त्यांनाच विचारा, असे पटेल यांनी सांगितले.
पटेल हे अजित पवारांविषयी म्हणाले की, आमचा पक्ष वाढला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यानुसार अजित पवार यांच्यासह सर्वच जण काम करीत आहेत. तसेच, अजित पवारांनी सूचित केले म्हणजे उद्याच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असे नाही. पक्षाला मोठे करा, स्पर्धेत भाग घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. राष्ट्रवादीला बळकट करायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.
पटेल यांनी राजकीय चर्चांविषयी म्हणाले की, दिल्लीत आमच्यात कोणतीही बैठक झाली नाही. मुंबईत सर्व पक्षाच्या बैठका होतात. आमचेही मुख्यालय तेच आहे. त्यामुळे बैठका होतात. पण दिल्लीत कोणतीही बैठक झाली नाही, हे स्पष्ट करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आणि सगळे निर्णय पवार साहेबांच्या माध्यमातूनच होत असतात, असे पटेल यांनी सांगितले.
Politics NCP Leader Prafull Patel Delhi Meet