मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता धनंजय मुंडे नॉट रिचेबल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील नेतृत्व आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. परळी आणि बीड हा भाग त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. खासकरुन इतर मागासवर्गीय समाजामध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. त्याबरोबर मुंडे हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे सांगितले जाते. २०१९मध्ये जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला होता आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या त्यावेळच्या हातमिळविणीवेळी मुंडे हे अजित पवार यांच्याोबत आहे. आताही अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय हालचालींवर अनेकांचे विशेष लक्ष आहे. त्यातच आता मुंडे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना आणखीनच वेग आला आहे.
आज सकाळपासून मुंडे यांच्याशी संपर्क होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल का झाले, अजित पवार यांच्या समर्थनार्थ हे सर्व सुरू झाले आहे का, राज्याच्या राजकारणातील संभाव्य भूकंपाची वेळ येऊन ठेपली आहे का, अशा शंकांनी सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
NCP Leader Dhananjay Munde Not Reachable Today