मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. सभागृहात याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भावना व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. याआधी अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले ज्यांनी या खुर्चीला न्याय दिला आणि आपले संबंध कायम ठेवले. नारायण राणे साहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांचा प्रचंड दरारा होता. प्रत्येक विषयात त्यांचा चांगला अभ्यास असे, मी अर्थमंत्री असताना अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अर्थसंकल्पाविरोधात जोरदार भाषण करत. त्यांची मांडणी प्रचंड प्रभावी असायची, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी खडसे साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचाही स्वभाव तसाच होता. विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात नेहमीच सौहार्द राहिले आहे ही आजपर्यंतची प्रथा आहे. हे सभागृह खेळीमेळीने चालायला हवे. सभागृहात मुंडे साहेब माझ्या विरोधात जोरदार भाषण करत आणि चहासाठी माझ्याच दालनात यायचे. विरोध हा फक्त त्या विषयापूर्ता मर्यादित असायला पाहिजे. मला विश्वास आहे की या सभागृहात ते पाळले जाईल.
विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढावू नेतृत्व आहे. सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर त्यांनी विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनही आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. अशा कठीण प्रसंगात एक आक्रमक व्यक्ती त्या पदावर बसणे आवश्यक होते. मला वाटतं या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड झाली आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा आगडोंब उसळला आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मोठा बदल घडत आहे. अशा परिस्थितीत विजयभाऊ विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देतील याचा मला विश्वास आहे.
२०१९ साली विजूभाऊ विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली. आज पुन्हा त्यांचे विरोधी पक्षनेते होणे हा शुभ संदेश आहे. मला विश्वास आहे की ते या पदाला योग्य न्याय देतील, आपल्या राज्यात गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडतील. मी त्यांना माझ्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो असे जयंत पाटील म्हणाले.
politics ncp jayant patil vidhansabha speech
Maharashtra Assembly Monsoon Session Opposition Leader