मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना विविध पक्षातील इनकमिंग, आउटगोइंगच्या चर्चा जोरात आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत तर दररोज कोणी ना कोणी आमच्या पक्षात येणार असल्याचा दावा करत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. ती शमत नाही तोच आता जयंत पाटलाच्या भाजपप्रवेशाने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. ईडीचा ससेमिरा सोडविण्यासाठी जयंत पाटील भाजपात जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. एकुणच जयंतरावांचे सुरू असलेले तळ्यातमळ्यात राजकीय वर्तुळासाठी नवे आकर्षण ठरले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात वरिष्ठ नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच, मला पक्ष संघटनेत काम करायचं आहे, मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छाच अजित पवारांनी बोलून दाखवली. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत जयंत पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची १० कारणे सांगितली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. त्यातच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता. ‘जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,’ असं विधान करुन संजय शिरसाट यांनी खळबळ उडवून दिली होती. अर्थात, जयंत पाटील यांनी हसत-खेळत सिरसाट यांच्या विधानावर पलटवार केला. मात्र, आता भाजपने जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा केला आहे.
भाजपने केला व्हिडिओतून दावा
जयंत पाटलांना शरद पवारांसारखेच आपल्या मुलाला राजकारणात आणायचे आहे. नुकताच त्यांचा मुलगा प्रतिक पाटील याला राजाराम सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून आणले आहे. पण, इथे स्वत: च्या पुतण्याला डावलणारे शरद पवार जयंत पाटलांच्या मुलाला थोडेच पुढे येऊ देणार, असेही या व्हिडिओतून भाजपने म्हटले आहे.
भाजपने शेअर केलेला व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1672631667582980098?s=20