मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवकरच जयंत पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकत्याच पुणे येथे झालेल्या गुप्त भेटीने ही शंका बळावली आहे. अशात आता शरद पवार यांनीच जयंत पाटलांच्या भाजपातील प्रवेशावर मोठा खुलासा केला आहे.
शरद पवार यांच्या रारूट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी खिंडार पाडली आहे. त्यांच्यासोबत असलेले जयंत पाटील यांना भाजपात आणण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. तशा घडामोडी सातत्याने घडताहेत. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनीच मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने पुन्हा जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चा घडत आहेत. जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ईडीची भीती घालून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपच शरद पवार यांनी केला.
पुण्यातील आमच्या बैठकीत अजिबात राजकीय चर्चा नव्हती. जयंत पाटील यांच्या बंधुना ईडीची नोटीस आल्याचे मला समजले. सत्तेचा गैरवापर करुन काही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनाही अशा नोटीसा आल्या. त्यामुळे, ते भाजपासोबत जाऊन बसले. आज तोच प्रयत्न जयंतराव यांच्यासोबत करण्याची भूमिका घेतलेली दिसते. पण, मला खात्री आहे की, त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असे म्हणत जयंत पाटील हे आपल्यासोबतच असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भातही भाष्य केलं. काँग्रेसच्या नेतृत्वाला आम्ही बोलावलं आहे. पण, कोण कोण येणार याबद्दल अद्याप आमच्याकडे त्यांची नावे आली नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. तर, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रश्नावर मला माहिती नाही, सध्या आम्ही जे आहोत तेच मला माहिती आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटलांनी केली भूमिका स्पष्ट
गुप्त भेट आणि भाजपात प्रवेश करण्यावर जयंत पाटील यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक आमदार मंत्री होऊ शकतो. मला ऑफर असल्याच्या बातम्या चर्चेत असतात. पण अशा बातम्या फारशा मनावर घेऊ नका. मी शरद पवारांसोबत आहे तुम्ही मनात काही विचार करू नका असाही मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच गुप्त भेटीबाबत काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही. ही गुप्त भेट नव्हती. मी शरद पवारांसोबत गेलो होतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही.
Politics NCP Jayant Patil BJP Join Sharad Pawar
Maharashtra