सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि पाऊस यांचं अनोखं नातं आहे. हे नातं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वांनी बघितलं. रविवारी सुद्धा शरद पवारांच्या एन्ट्रीलाच पावसाचीही एन्ट्री झाली. पण यावेळी राजकीय सभा नव्हती तर एका मित्राला दिलेला शब्द पाळण्याचा प्रसंग होता.
शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पंढरपूर आणि सांगोल्याच्या भेटी झाल्यानंतर ते एका लग्नाला उपस्थित होते. अर्थात लग्नाला पोहोचायला जरा उशीरच झाला होता. पण मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी शरद पवार मांडवात पोहोचले. ते गाडीतून उतरताच पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. कारण शरद पवारांचे पावसात भिजणे २०१९ च्या निवडणुकीची आठवण देणारे ठरले.
या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील उभे होते. त्यांच्या पुढे उदयनराजे होते. त्यामुळे आव्हान तसे मोठेच होते. पण शरद पवार यांनी जाहीर सभेत संपूर्ण भाषण पावसात भिजत दिले आणि बाजीच पलटवून टाकली. त्याचा परिणाम केवळ श्रीनिवास पाटील यांना विजय मिळवून देण्यावरच झाला असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस संपलेला पक्ष आहे, अशी टीका करणाऱ्यांना विधानसभेतही पवारांच्या जादूने उत्तर दिले. त्यामुळे शरद पवार मित्राकडे लग्नाला पोहोचल्यावर पावसाची एन्ट्री झाल्यामुळे सगळीकडे हाच विषय चर्चेला होता. पवार यांनी वधू-वराला आशीर्वाद दिले.
नेता नव्हे मित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोलापूरचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता. खरे तर सपाटे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचे महत्त्व आहेच. पण त्याहीपेक्षा एका मित्राच्या कुटुंबातील लग्न म्हणून शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावली, हे विशेष.
https://twitter.com/RupeshHole3/status/1655281439724953600?s=20
https://twitter.com/MahavikasAghad3/status/1655513798202228736?s=20
Politics NCP Chief Sharad Pawar Wedding Visit Rain