पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील बालगंधर्व मंदिर येथे विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. नोटबंदी, नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदा, महाविकास आघाडीतील जागा वाटप यासह विविध विषयांवर त्यांनी थेट भाष्य केले.
पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना त्रास देण्यात आला तसेच सातत्याने ते चुकीच्या गोष्टींची भूमिका माध्यमांसमोर मांडत होते त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण किंमत मोजत असताना ज्यांच्यासंदर्भात भूमिका घेतली होती, त्या लोकांबद्दल काही कारवाई करण्याचा निर्णय देशातील मोठ्या संस्थेला म्हणजेच सीबीआयला घ्यावा लागला याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका किती सत्यावर आधारीत होती हे स्पष्ट झाले.
दोन हजाराच्या नोटीसंदर्भात एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. यापूर्वीही अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने प्रचंड लोकांचे नुकसान झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधी रक्कम होती जी बदलून दिली नाही. त्यातून बँकेचे आर्थिक नुकसान झाले. निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्या जास्त गुंतवणूक आहे त्यांना बदल करून द्यायची जबाबदारी पाळायची नाही आणि आम्ही काही वेगळे करतोय असे दाखवायचे. त्यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने देशात चमत्कार केवळ इतकाच झाला की अनेकांनी आत्महत्या केला. अनेक कुटुंब, अनेक व्यावसायिक हे उद्धवस्त झाले. तो चमत्कार पुरेसा नाही म्हणून हा दुसरा चमत्कार केला आहे.
काही दिवसांपासून राज्यातील हिंसक वळणामागील शक्ती कोणती आहे, त्यामागील विचारधारा कोणती आहे हे पाहिले तर आज ज्यांच्या हाती देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे हे तपासायची वेळ नक्की आली आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे. यामध्ये काही लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्वतंत्र लढावे, इतरांनी स्वतंत्र लढावे मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही.
राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहूल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे.
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे, असे त्यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/3357268637918051/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=wdpexu
Politics NCP Chief Sharad Pawar Press Conference