मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या वक्तव्य आणि ठाम भूमिकांमुळे चर्चेत असलेल्या शरद पवार यांनी आता आणखी मोठा खुलासा केला आहे. अदानी प्रकरणासह विविध बाबींवर त्यांनी त्यांची भूमिका मांडल्याने सर्वत्र मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्यातच आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाष्य केले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविक आघाडीने सरकार स्थापन केले. सुमारे अडीच वर्ष हा सत्तेचा गाडा चालला. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत सत्ता संघर्ष पुकारला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. परंतु त्यापूर्वीच पूर्वसंध्येला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यासंदर्भात शरद पवार यांनी आता भाष्य केले आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना विचारात घ्यायला हवे होते. राजीनामा देताना सहकारी पक्षांना कोणतीच कल्पना दिली नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात तिन्ही पक्षांचा सहभाग होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येत संख्येची चाचपणी करून हा निर्णय घेतला होता. मात्र त्या संबंधित जर कोणी विचार करून दुसरा निर्णय घेत असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत याबाबत चर्चा करणे आवश्यक होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Politics NCP Chief Sharad Pawar on Uddhav Thackeray