मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत आणि येत्या दहा दिवसांत त्याचा निकाल लागेल, अश्या राजकीय चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. अश्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रम पत्रिकेत अजितदादांचे नावच नसल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी मरेपर्यंत राष्ट्रवादीत असेन, असे पत्रकारांना सांगितले. तसेच राजकीय अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन त्यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. पण या सर्वांमधील एक कॉमन बाब एवढीच आहे की अजित पवार भाजपसोबत सत्तेत जातील. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक दिवस अचानक पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द करणे, एक दिवस समर्थित आमदारांची बैठक घेणे अश्या घटना घडल्या.
आता २१ एप्रिलला घाटकोपर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर होणार आहे. खरंतर अजितदादांची उपस्थिती स्वाभाविक होती. पण, पिपंरी-चिंचवडच्या कार्यक्रमाला जाणार असल्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे सूत्रांकडून कळले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घाटकोपर येथील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि या कार्यक्रमाच्या पत्रिकेत अजितदादांचे नावच नाही. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
यांची असेल उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे घाटकोपर येथील शिबिर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षस्थानी असतील. याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटके यांच्यासह छगन भुजबळ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत ‘ध्येय राष्ट्रवादीचे…मुंबई विकासाचे’ या विषयावर हे शिबीर होईल.
चर्चेतील मुद्दे
मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक हा या शिबिराचा मुख्य अजेंडा असला तरीही एकूणच राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीवर यावेळी चर्चा होणार आहे. यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती, महिला असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, नागरी सुविधांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
Politics NCP Chief Sharad Pawar Meet Ajit Pawar name