मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणातील चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्र असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज येथे संपन्न होत आहे. याच सोहळ्यात पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, २४ वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.
शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ याचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होत आहे. याच समारंभात पवार यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यानंतर आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा कुणाकडे दिली जाणार आहे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे की अन्य कुठल्या व्यक्तीकडे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1653300033721335808?s=20
उपस्थितांची घोषणाबाजी
दरम्यान, शरद पवार यांच्या या घोषणेनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पवार यांच्या घोषणेनंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा केली. कृपया हा निर्णय मागे घ्या, असे आर्जव केले. तर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पवार यांच्या पाया पडून निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी शरद पवार, शरद पवार अशा जोरदार घोषणा झाल्या.
अखेर पवार म्हणाले..
निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी सर्वांना शांत करत पवार म्हणाले की, काळजी करु नका. मी कुठेही असलो तरी सकाळ ते संध्याकाळ मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन. आपण आपल्या अडी-अडचणी मांडू शकाल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच माझ्यासाठी मोठे आहे. त्यापेक्षा अन्य काहीही नाही.
Politics NCP Chief Sharad Pawar Big Announcement