नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भारीप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीवेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ भुजबळ यांनी आमदारकी सोडायला हवी, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले. त्यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ यांनी प्रतिक्रीया देताना प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचाराचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांना जोरदार टोला हाणला आहे. त्यामुळे भुजबळ यांनी अतिशय चपखलपणे आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
भुजबळ म्हणाले की, “तुम्हाला जनतेची कामं करायची असतील तर सत्तेत राहूनच लढा द्यावा लागेल. तरच तुम्ही समाजासाठी अधिक प्रभावी पद्धतीने काम करू शकता.” ….. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रकाश आंबेडकर साहेब, खुद्द बाबासाहेबांनी सांगितलेला हा विचार आपल्याला कसा विसरता येईल! सध्याच्या राज्यकर्त्यांना राजीनामा, बहिष्कार अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. त्यामुळे त्यांच्याशी लढायचंच असेल तर आपल्याला आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा, पदाचा अधिक ताकदीने वापर करून लढा द्यावा लागेल. मला विश्वास आहे की बाबासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून या लढाईत तुम्ही देखील आम्हाला खंबीर साथ द्याल!, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
Politics NCP Chhagan Bhujbal on Prakash Ambedkar Demand