पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांना महत्त्व देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक पातळीवर नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. म्हणजेच, अजित पवार यांचा गट सध्या शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. असे असताना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची अजित पवार यांची ही रणनिती असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार म्हणाले की, भाजपसोबत गेल्याने टीका होत आहे. मात्र, मी लोकांची कामे करण्यासाठी सोबत गेलो आहे. विचारधारा सोडलेली नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत एकत्रित लढविल्या जातील. मात्र, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर पवार यांनी प्रथमच येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे पाटील, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, कविता आल्हाट, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, श्याम लांडे, सतीश दरेकर उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केव्हाही पालिकेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
शरद पवारांचा टाळला उल्लेख
मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिल्याचे जाहीर केले आहे. निगडी ते कात्रजपर्यंत मेट्रोच्या विस्ताराची गरज आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी रेडझोन, साडेबारा टक्के परतावा जमीन, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, मुबलक पाणीपुरवठा, नदी सुधार योजना या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. पवार यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. संपूर्ण जगात मोदी यांच्यासारखा लोकप्रिय नेता नाही, असा उल्लेख केला. मात्र, पाऊण तासाच्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी त्यांनी शब्दही काढला नाही.
Politics NCP Ajit Pawar Upcoming Elections Strategy
Pune PCMC Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections