नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी शरद पवार हे एकच नाव खूप चर्चेत असायचे. त्यानंतर वातावरण बरेच बदलले आणि इतरही पक्षातील नेत्यांची नावे चर्चेत राहू लागली. मात्र पवार कुटुंबातील एक नाव अधिक गाजू लागले आणि ते आहेत अजितदादा. आता त्यांनी नंदूरबार जिल्ह्यात एका ठिकाणी दिलेल्या गुप्त भेटीचे कारण जाणून घेण्याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
४ वर्षांपूर्वी काकांची साथ सोडून भाजपसोबत पहाटे शपथ घेणे असो किंवा काही दिवसांपूर्वी पुन्हा भाजपमध्ये जाण्याची चर्चा असो, अजितदादा सतत कुठल्या ना कुठल्या प्रकरणामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी नंदूरबार जिल्ह्याला भेट दिली. खान्देश एक्स्प्रेसने ते नंदूरबारमध्ये पोहोचले. तिथे ते थेट विश्राम गृहात गेले आणि काही वेळ आराम केला. माध्यमांचे त्यांच्यावर लक्ष होते. पण आता आरामच करताहेत म्हटल्यावर कोण टेंशन घेणार. काहीवेळाने ताफा विश्रामगृहावरच होता, पण अजितदादा खासगी गाडीत बसून निघून गेले. ते कुठे गेले, कोणत्या दिशेने गेले, कुणालाच कळले नाही.
काहीवेळाने नंदूरबार येथील आयान मल्टिट्रेड साखर कारखान्याबाहेर मंत्र्यांचा ताफा लोकांना दिसला. हा ताफा अजितदादांचाच आहे, हे स्पष्ट झाले. कारखान्यातून बाहेर पडून ते ताफ्यासोबत पुन्हा विश्रामगृहावर आले. मुख्य म्हणजे त्यांच्या आयुष्यात वादग्रस्त ठरलेल्या या कारखान्याला पुन्हा भेट देण्याचे कारण कुणालाच कळले नाही. विशेष म्हणजे माध्यमांना टाळून जाण्याचे काय कारण असावे, याचाही शोध घेतला जात आहे.
ईडीची आठवण!
गेल्यावर्षी ईडी आणि आयकर विभागाच्या छाप्यांमुळे हा कारखाना चर्चेत आला होता. नंदूरबार जिल्ह्यातील मल्टिट्रेड साखर कारखाना अजित पवार यांच्या मालकिचा असल्याचे बोलले जाते. छापेमारीच्या वेळी अजित पवार यांचे नाव या कारखान्यांशी जोडले गेले. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यताही बोलली गेली होती. परंतु, ईडीचे संकट टळल्यानंतर अजितदादा पुन्हा कारखान्याच्या दिशेने वळल्याचे स्पष्ट होत आहे.