नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे काही नेते कधी काय बोलतील आणि वाद निर्माण होईल याचा नेम नाही. त्यातल्या त्यात राजकीय विधाने तर कायमच चर्चा घडविणारी असतात. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सध्या अश्याच एका विधानामुळे चर्चेत आहेत.
वाद निर्माण करणाऱ्या विधानांसाठी परिचित असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्यावर्षी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार अजित पवार यांच्यामुळेच कोसळले असे म्हटले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी केलेले हे विधान आता खमंग राजकीय चर्चेला कारण ठरत आहे. अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेऊन २०१९ मध्ये अनेकांना धक्का दिला होता. त्यानंतर दोनच दिवसांत ते पुन्हा माघारी परतले आणि काही दिवसांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.
त्यावेळी अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत सत्तेत राहण्याचा निर्णय कायम ठेवला असता तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच आले नसते. पण काकांनी जादुची काडी फिरवली आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बरेच लोक महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अजित पवार यांना श्रेय देतात. मात्र गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावर अजित पवार यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रीमंडळ विस्तार लवकरच
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असून ते मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर लवकरच विस्तार होईल. भाजप आणि शिंदे गटात सारेकाही छान आहे. कुणीही नाराज नाही. मतदारसंघांवरून वाद होण्याचेही कारण नाही. जे भाजपचे आहे ते भाजपकडेच राहणार आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
उद्धव यांची वाईट अवस्था
अनेक आमदार-खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. आणखीही होणार आहेत. रोज कुणीतरी त्यांची साथ सोडून जातो. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनाला त्यांना शुभेच्छा द्यायला फक्त सकाळचा भोंगा आहे. बाकी कुणीही नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे, असा टोमणाही त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता मारला.