मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. चर्चांचा हा हंगाम जोरात असतानाच अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राचीही सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, हे पत्र राजकीय नसून महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भातील आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी गेल्याचे अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना केवळ ५ लाख रुपयांची मदत करून सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. तसेच या दुर्घटनेमुळे बाधितांना मोफत उपचार देऊन त्यांनाही प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी अजितदादांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1648236071128555520?s=20
Politics NCP Ajit Pawar Letter to CM DYCM